Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

लोकैषणा आणि आत्मनिष्ठा

$
0
0

दि. १८ जानेवारी १९७७ची दुपार आणीबाणीविरोधातील मंडळी कधीच विसरणार नाहीत. मुंबईतल्या 'हिंमत' साप्ताहिकाच्या कार्यालयात आम्ही आठ-दहाजण बसलो होतो. रेडिओवरच्या बातम्या कानात प्राण आणून ऐकत होतो. इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्तीची व सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. सर्व राजबंद्यांची त्वरित सुटका करण्याचे आदेशही दिले होते. आदल्या वर्षात आणीबाणीविरुद्धचे वातावरण झपाट्याने निवळत गेले होते. एकमेकांना धीर द्यायचा, मनोबल कायम ठेवायचा आपापल्या परीने आम्ही प्रयत्न करत होतो; पण आता बहुसंख्य जनतेनेच आणीबाणी स्वीकारली आहे हे आम्हाला मनोमन कळून चुकले होते. आणि त्या दुपारी अत्यंत अनपेक्षितपणे ती घोषणा झाली. आमचा कानावर विश्वासच बसत नव्हता.

पण त्या जल्लोषातही 'आपल्या अनियंत्रित सत्तेला कुठलंही आव्हान नसताना इंदिराजींनी निवडणुका का बरं जाहीर केल्या असतील?' असे एकमेकांना विचारत होतो आणि आजही हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला आहे. उत्तरादाखल रामचंद गुहा यांनी 'इंडिया आफ्टर गांधी' या ग्रंथात दिलेले स्पष्टीकरण पटण्याजोगे वाटते. काही इंग्रज हितचिंतकां-कडून होत असलेल्या टीकेची बोच, लोकांत पुन्हा मोकळेपणे मिसळावे व त्यांचे कोडकौतुक अनुभवावे ही तीव्र ओढ, आपली लोकप्रियता पुन्हा निविर्वाद सिद्ध करण्याची इच्छा ही कारणे गुहांनी सूचित केली आहेत. म्हणजे लोकैषणेपोटीच (लोकस्तुतीच्या आकांक्षेपोटीच) इंदिराजींनी निवडणुका घेतल्या आणि पराजय पदरी पाडून घेतला. या लोकैषणेचे शमन कधीच होत नसल्याने असमाधानाचा तो एक कायम सोत बनतो. आयुष्यात खूप मानसन्मान मिळवलेली आणि तरी वृत्तपत्रात चार-पाच दिवस आपले नाव छापून आले नाही तर उतारवयातही अस्वस्थ होणारी माणसे मला ठाऊक आहेत.

ही लोकैषणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीने आपले कौतुक करावे या अपेक्षेत एकवटते तेव्हा तर ती खूपच दु:ख निर्माण करते. मी स्वत: दोन-तीन जणांच्या बाबतीत हे दु:ख दीर्घ काळ भोगले. मग एक दिवस जाणवले की, मी काहीही केले तरी ही मंडळी माझे कौतुक करणार नाहीत. नावडतीचे मीठ त्यांना अळणीच लागेल. कदाचित मला कमी लेखणे किंवा अनुल्लेखाने मारणे ही त्यांची स्वत:ची आंतरिक गरजही असू शकेल. हे पटवून घेणे मला सुरुवातीला खूप जड गेले, पण हळूहळू त्या विशिष्ट व्यक्तींकडूनची माझी कौतुकाची अपेक्षा संपली व त्यातून मोकळेपणाचा वेगळाच आनंद मला लाभला.

लेखक म्हणून जगताना तर या लोकैषणापासून स्वत:ला सांभाळणे अधिकच अवघड असते. लेखनात पैसा फारसा नसतोच; पण त्यामुळे लेखकाची कौतुकाची-मोठेपणाची अपेक्षा, वरकरणी झाकली तरी अधिकच तीव्र बनते. आपल्याला योग्य तितका मोठेपणा मिळालेला नाही, ही जवळपास प्रत्येक लेखकाची भावना असते; त्याच्याशी मैत्री करणे इतरांसाठी अवघड करणारी. मुळातच लेखक-कलावंत कमालीचे हळवे, संवेदनक्षम असतात; लेखकपणाची ती एक अपरिहार्य किंमतच असते. आपल्या पुस्तकाचे परीक्षण न छापले जाणे हे त्यांना स्वत:कडे केले गेलेले दुर्लक्ष वाटते, आपल्या लेखनाचा अस्वीकार हा त्यांना स्वत:चाच अस्वीकार वाटतो. या संदर्भात एक लेखक म्हणून मी स्वत:ही खूपदा दुखावला गेलो आहे आणि एक संपादक म्हणून मीही अनेकांना दुखावले असणार.

विंदा करंदीकरांचा एक अनुभव आठवतो. १९४९ साली, वयाच्या ३१व्या वषीर्, 'स्वेदगंगा' हा आपला पहिलाच कवितासंग्रह विंदांनी स्वखर्चाने प्रकाशित केला व त्याची एक प्रत त्यांनी त्यावेळी मराठी कवितासृष्टीत सवोर्च्च स्थानी असलेल्या मढेर्करांना भेट म्हणून दिली. पण त्यावरची मढेर्करांची थंड प्रतिक्रिया बघताच त्यांनी मढेर्करांच्या पुढ्यात ठेवलेला तो संग्रह शांतपणे उचलला आणि ते पुढे निघून गेले- 'नाही वाचली त्यांनी आपली कविता म्हणून काय फरक पडतो', अशी आत्मनिष्ठा मनात बाळगत.

याला कोणी अहंकार म्हटले तरी हरकत नाही, पण लोकैषणेवरचा एक लगाम म्हणून तरी ही आत्मनिष्ठा, स्वत:च्या अंतर्नादाशी प्रामाणिक राहण्यातच खरे समाधान मानण्याची वृत्ती लेखकांनी आवर्जून जपायलाच हवी.

- भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>