Quantcast
Viewing latest article 24
Browse Latest Browse All 48

अध्यात्म : न संपणारा प्रवास

- भानू काळे

माझे अध्यात्म म्हणजे माझे एकूण जीवनविषयक तत्त्वज्ञान या भूमिकेतून या लेखमालेतील आजवरचे लेख लिहिले असले तरी अध्यात्म शब्दाची व्याप्ती या भूमिकेच्या पलीकडेही आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच या शेवटच्या लेखात अध्यात्म शब्दाच्या पारंपरिक अर्थाच्या अनुषंगाने काही विचार मांडावेसे वाटतात.

श्रद्धा हे आध्यात्मिकतेचे मूळ आहे किंवा आध्यात्मिक वाटचालीची सुरुवात श्रद्धेपासून सुरू होते असे म्हणतात येईल. ''ज्याच्या सिद्धतेसाठी पुराव्याची गरज नाही असा विश्वास म्हणजेच श्रद्धा,'' अशी एक व्याख्या केली जाते आणि पुराव्याची गरज नसल्यामुळेच श्रद्धेचे वा आस्तिकतेचे बौद्धिक पातळीवर खंडन वा मंडन करता येत नाही. पण श्रद्धावानाला पुराव्याची गरज नसली तरी ही श्रद्धा यथार्थ आहे, किंबहुना तिची खूप आवश्यकता आहे, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे पुढे येत आहेत आणि विशेष म्हणजे शास्त्रशुद्ध पाहण्यांमधून पुढे येणारे हे पुरावे आहेत. डीन ऑनिर्श यांच्यासारखे विश्वविख्यात हृदयरोगतज्ज्ञ उपचारांमध्ये श्रद्धा, प्रार्थना यांना खूप महत्त्व देताना दिसतात, ते याच वाढत्या अनुभवसिद्ध जाणिवेमुळे. आध्यात्मिकतेची ही ओढ कमी अधिक प्रमाणात सगळ्याच माणसांमध्ये असते. मानवी जनुकांमध्येच ती असावी, असे वाटण्याइतकी ती पुरातन आणि सार्वत्रिक आहे.

सॉमरसेट मॉम, माल्कम मग्रीज यांच्यासारख्या नास्तिक साहित्यिक-विचारवंतांनाही पुढे उतारवयात माणसातील आध्यात्मिक ओढ ही ईश्वरी अस्तित्वाचा एक पुरावा वाटलेली आहे.

साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला यांना या ओढीतून मोठीच चालना मिळत गेली आहे. जगातील अनेक सर्वश्रेष्ठ चित्रे रोमच्या सेंट पीटर्स चर्चच्या छतावर आहेत, तर भारतीय शिल्पकलेचा सर्वश्रेष्ठ आविष्कार अजिंठा, वेरुळ, कोणार्क, दिलवाडा, श्रवणबेळगोळा येथील मंदिरांतच दिसतो. सर्व भारतीय नृत्येही प्रथम मंदिरांच्या प्रांगणातच बहरली. कलावंतांना या आध्यात्मिकतेने कायम भुरळ घातली आहे. यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाच बीटल्सने महेश योगी यांचे शिष्यत्व पत्करले. बीटल्सचेही विक्रम मोडणारी पॉपसिंगर मडोनादेखील दरवर्षी महिनाभर आध्यात्मिक साधनेसाठी हिमालयात येते. आध्यात्मिक ओढीची ही लाट आज भारतातही आली आहे. सत्यनारायण गोएंका यांच्या विपश्यनेला, श्री रवीशंकर यांच्या सुदर्शनक्रियेला वा बाबा रामदेव यांच्या योगासनांना समाजाच्या सर्व स्तरांतून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. त्यातून स्वत:साठी महत्त्वाचे असे काही तरी मिळते म्हणूनच ही मंडळी अध्यात्मवाटेच्या या नवनव्या आविष्कारांकडे आकर्षित होत असतात.

मानवी मनाचे उन्नयन आणि मानवी संस्कृतीचा विकास साधणारी एक मूलगामी प्रेरणा आध्यात्मिकतेची ओढ ही आहे. देव आहे का? विश्वाची निमिर्ती त्यानेच केली का? आत्मा म्हणजे काय? यासारखे मूलगामी प्रश्न अध्यात्माच्या कक्षेत येतात. समजू लागले तेव्हापासून हे प्रश्न मला सतावत आले आहेत व त्यांनी माझ्या जीवनाला अधिक अर्थसंभाव्यता प्रदान केली आहे. त्यांची निविर्वाद उत्तरे मला सापडलेली नाहीत; अन्य कोणालाही ती सापडली असतील असे वाटत नाही. पण प्रत्यक्ष उत्तरांपेक्षा उत्तरांचा शोधच खूपदा माणसाला अधिक उन्नत करणारा असतो. माझ्यापुरते सांगायचे तर यशापेक्षा अपयशातून आणि उत्तरांपेक्षा प्रश्नांतूनच माझे जीवन घडत गेले आहे.
........................

'तिसरी चांदणी,' 'कॉम्रेड' यासारख्या कादंबऱ्यांमुळे रसिकांपर्यंत पोचलेले सकस लेखणीचे भानू काळे हे 'अंतर्नाद' या वाङ्मयीन, सांस्कृतिक आणि वैचारिक मासिकाचे संपादक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing latest article 24
Browse Latest Browse All 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>