Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

मुनाफची बिर्याणी

$
0
0

महम्मद मुनाफला मी प्रथम बघितले तेव्हा तो तिशीतला होता. मी तेव्हा सातवी-आठवीत असेन. वर्णाने मुनाफ अगदी काळा होता. कपडे मात्र स्वच्छ पांढरे असायचे. बुटका बांधा. चापून मागे वळवलेले, तेल लावलेले केस. मूळचा तो ढाक्क्याचा होता.

पोर्ट ट्रस्टच्या एका ड्रेजिंग शिपवर तो काम करायचा. बंदरातील गाळ उपसून काढणे हे या बोटींचे काम. पगार चांगला मिळायचा. दुदैर्वाने पुढे तो कसल्यातरी अडचणीत सापडला. पासपोर्टची काहीतरी भानगड होती. पोलिसांचा त्रास सुरू झाला. नोकरी गेली. खासगी बोटींवर बारीकसारीक कामे करून कशीबशी गुजराण करू लागला. लेबर कोर्टात त्याने केस दाखल केली होती व त्यामुळे तो किंग्ज सर्कलला आमच्या घरी वरचेवर येऊ लागला.

त्या काळच्या कामगारचळवळीत ध्येयवाद भरपूर होता. शिवाय कामासाठी घरी येऊ नये, युनियनच्या ऑफिसातच भेटावे, असले काही दंडक नव्हते. त्यामुळे कामगारांचा आमच्या घरी कायम राबता असे. त्या काळी गोदी कामगारांमध्ये बरेच मुसलमान असत. साहजिकच अगदी लहानपणापासून मी मुसलमानांच्या संपर्कात आलो; मुख्य म्हणजे त्यांना एक माणूस म्हणून ओळखू लागलो. धर्मनिरपेक्षता अगदी सहजगत्याच माझ्या अंगी बाणली, माझ्या 'अध्यात्माचा' एक भाग बनली. मुनाफ त्यांच्यातलाच एक. तो मला विशेष आवडायचा; कारण आमच्या घरी येताना खूपदा तो 'अफलातून' नावाची मिठाई घेऊन यायचा. ती मला खूप आवडायची.

पुढे माझे लग्न झाले. एक दिवस संध्याकाळचा मुनाफ आमच्या घरी आला अन् म्हणाला, 'चलो, आज मैं आप को पाटीर् देता हूँ।' त्याच्या बिकट परिस्थितीची आम्हाला कल्पना होती. पण त्याने खूपच आग्रह केला म्हणून कसेबसे आम्ही तयार झालो- मी, पत्नी वर्षा व कॉम्रेड. रस्त्यावर येताच मुनाफने मोठ्या ऐटीत टॅक्सी थांबवली. पार कुलाब्याला तो आम्हाला घेऊन गेला. तिथल्या एका मुसलमानी हॉटेलात आम्ही गेलो. 'बॉम्बे की सब से बेस्ट बिर्याणी यहाँ मिलती है,' मुनाफ सांगू लागला. बिर्याणी येईस्तोवर त्याने आमच्यासाठी खास आणलेले प्रेझेंट हळूच आमच्या पुढ्यात ठेवले. त्याच्या कुठल्यातरी मित्राने दुबईवरून आणलेला एक पँटपीस त्याने मला दिला, वर्षाला सेंटची एक बाटली दिली आणि कॉम्रेडांना परदेशी सिग्रेटचा एक मोठा पॅक दिला. जरा वेळाने ती स्पेशल बिर्याणी आली. वाफाळलेली, तेलातुपाने माखलेली. खरोखरच ती अत्यंत चवदार होती. तो स्वत: मात्र फारसे काही खात नव्हता, जणू आम्हाला आवडीने खाताना बघूनच त्याला तृप्त वाटत होते. ती तृप्ती, तो आनंद त्याच्या डोळ्यातून पाझरत होता. जेवण झाल्यावर आम्हा तिघांना टॅक्सीने घरी सोडले व मगच तो आपल्या घरी गेला.

बघता बघता वषेर् सरली. मी पुण्याला आलो. त्यानंतरची, अगदी अलीकडची एक घटना. नात्यातल्या एका जोडप्याला मुंबईला जायचे होते. दोघेही वृद्ध आणि बरोबर सामानही बरेच होते. म्हणून मी टॅक्सी बोलावली होती. निरोप देताना मी टॅक्सीवाल्याला त्याचे नाव विचारले. पहिल्यांदा त्याने काही उत्तरच दिले नाही. मग दुसऱ्यांदा विचारले, तेव्हा 'उस्मान' असे तो हळूच पुटपुटला. तीन-चार तासांनी त्या नातेवाईकांचा फोन आला. म्हणाले, 'आम्ही सुखरूप पोचलो. ड्रायव्हरनं टॅक्सी उत्तम चालवली. दादरला त्यानंच दुसरी लोकल टॅक्सी आम्हाला बघून दिली. सामानही स्वत:च त्या दुसऱ्या डिकीत ठेवलं. मी ५० रुपये बक्षिस देत होतो तर तेही त्यानं घेतले नाहीत. म्हणाला, 'मैंने तो सिर्फ मेरा फर्ज निभाया।' मला सकाळचे त्या टॅक्सीवाल्याचे आपले नाव सांगतानाचे घुटमळणे आठवले आणि हृदयात कालवाकालव झाली. वाटले, किती द्वेष भरलाय आपल्या समाजात! आपले नाव सांगतानाही त्या बिचाऱ्या उस्मानला धास्ती वाटावी? भीती, दहशत तशी अनेकांना अनेक कारणांनी वाटू शकते, पण अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांकडून वाटू शकणाऱ्या असल्या भीतीचे स्वरूप खूप भयावह असते.

मुनाफची ती प्रेमळ नजर आणि त्याची ती बिर्याणी त्या रात्री पुन:पुन्हा आठवत राहिली.

- भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>