Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

चार गोड शब्द

$
0
0

- भानू काळे

पाचगणीच्या त्या परिषदेला आलेले ३०-४० प्रतिनिधी, एक दिवस सुट्टी होती म्हणून महाबळेश्वरला गेले होते. मी मागेच राहिलो होतो. माझी पत्नी वर्षा त्यांच्याबरोबर गेली होती. एसटीच्या बसमधून सगळा प्रवास झाला होता. संध्याकाळी मुक्कामी परतल्यावर वर्षाच्या लक्षात आलं की तिची पर्स बसमध्येच राहिली होती. आम्ही खूप काळजीत पडलो; कारण पैसे, मोबाइल, घराच्या किल्ल्या, ड्रायव्हिंग लायसन्स अशा वस्तू पर्समध्ये होत्या. बसमध्ये विसरलेली वस्तू परत मिळण्याची आशा नसतेच; पण तरीही आम्ही, वाई डेपोची बस होती म्हणून एका मित्राची कार घेऊन वाई डेपोच्या दिशेने निघालो. सुदैवाने ती बस आम्हाला दिसली. ड्रायव्हर बाजूलाच उभा होता. त्याच्या हातात पर्स होती. आम्हाला बघताच लगबगीनं तो पुढं झाला आणि हातातली पर्स दाखवत म्हणाला, 'हे तुमचंच आहे ना?'

आमच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्याच्या हातातली पर्स घेऊन वर्षाने उघडली. सगळे सामान ठीक असल्याची चाचपणी केली. 'तुमच्या हातात ही पर्स मी बघितली होती बाई. आता ती पाचगणीला तुमच्यापर्यंत कशी पोचवायची याचाच मी विचार करीत होतो,' ड्रायव्हर म्हणाला. बक्षीस म्हणून मी त्याला ५० रु. देऊ केले, तेव्हा 'बाई आमच्याशी इतकं चांगलं बोलल्यानंतर तुमच्याकडून बक्षीस कसं घ्यायचं साहेब?' असं म्हणत ड्रायव्हरने ते पैसे नाकारले.

'असे काय तू बोलली होतीस त्याच्याशी?' पाचगणीला परल्यावर मी कुतूहलानं विचारलं. वर्षा सांगू लागली, 'मघाशी सगळे बसमधून उतरत असताना मी त्या ड्रायव्हरपाशी जाऊन म्हटलं, 'दिवसभर तुम्ही चांगलं ड्रायव्हिंग केलंत. थँक्यू!' एवढा आनंद झाला त्याला! तो म्हणाला, 'बाई, ड्रायव्हर म्हणून एसटीमध्ये २८ वर्षं सव्हिर्स झाली आहे. माझं नाव शेख. शिव्या देणारे पॅसेंजर आम्हाला रोजच भेटतात. थँक यू म्हणणाऱ्या तुम्ही पहिल्याच!' बस, एवढंच झालं होतं आमचं बोलणं.

वेळच्या वेळी उच्चारलेले प्रामाणिक कौतुकाचे चार शब्द एखाद्याला केवढा आनंद देऊ शकतात, याची जाणीव भारावून टाकणारी होती. एसटी प्रवासातल्या त्रासदायक गोष्टी तशा अगणित आहेत. रस्ते खराब असतात. गाड्या नीट देखभाल केलेल्या नसतात. अस्वच्छ असतात. गर्दी फार असते. एकूणच वाहतूक बेशिस्त असते... एक ना दोन. त्या दूर करणे आपल्या हाती नसते. त्या केव्हा दूर होतील ते सांगणेही अशक्य आहे. पण या सगळ्या त्रासाला आपले कौतुकाचे चार शब्द सहजगत्या एक रूपेरी कडा देऊन जातात. काही क्षणतरी आनंद फुलतात.

आणि हे 'फुकाचे' चार शब्द बोलायचे आपण टाळतो तेव्हा काय होते, हे दाखवणारा दुसरा एक अनुभव. आमच्या जवळ राहणारे एक गृहस्थ सांगत होते, 'माझी आई अतिशय उत्तम स्वयंपाक करायची. अख्ख्या पंचक्रोशीत तिचा हात धरणारं कोणी नव्हतं. गावात कोणाकडेही काही कार्य असलं, की स्वैपाकाला तिला बोलावलं जायचं. सगळे तिच्या स्वयंपाकाची खूप स्तुती करायचे. पण मरतेवेळी आई मला म्हणाली, 'बाळा, आयुष्यभर मी सगळ्या गावाकडून स्तुती ऐकली. पण तुझा बाप काही आयुष्यात कधी म्हणाला नाही, की तू चांगला स्वयंपाक करतेस म्हणून! त्यांच्याकडून हे चार शब्द ऐकायला मी आसुसलेले होते. पण म्हातारा मरेस्तोवर एकदाही हे बोलला नाही!'... हे गृहस्थ मुंबईतल्या एका बड्या कंपनीत माकेर्र्टिंग मॅनेजर होते. त्यांच्या आईची कोणत्याही प्रकारे आबाळ झाली नव्हती. सगळे तिच्याविषयी चांगलेच बोलायचे. पण ज्याच्याकडून कौतुकाचे शब्द ऐकायचे होते, ते मात्र कधीच बाहेर आले नाहीत. ते शल्य उराशी घेऊनच त्या बाई वारल्या.

कौतुकाचे चार गोड शब्द. ते बोलायला ना त्रास पडतो, ना खर्च येतो. पण हे 'फुकाचे' चार शब्द केवढा आनंद निर्माण करतात! आणि आळसापोटी वा अहंकारापोटी वा उदासीनतेपोटी ते बोलायचे आपण टाळतो, तेव्हा आपण अकारण किती दु:ख निर्माण करतो! आपण कितीही छोटे असलो तरी आसपासच्या आनंदात किंवा दु:खात भर घालण्याची आपली क्षमता मोठीच असते.
---------------------

'तिसरी चांदणी,' 'कॉम्रेड' यासारख्या कादंबऱ्यांमुळे रसिकांपर्यंत पोचलेले सकस लेखणीचे भानू काळे हे 'अंतर्नाद' या वाङ्मयीन, सांस्कृतिक आणि वैचारिक मासिकाचे संपादक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>