Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

योग: कर्मसु कौशलम्

$
0
0

'कोणी केलं रे हे बायडिंग?' हातातले जर्नल उंचावत गोताड बाईंडरनी घुश्श्यातच आजूबाजूच्या कामगारांना विचारले. कुठल्याही अस्सल बाईंडरप्रमाणे तेही 'बाईंडिंग'ऐवजी 'बायडिंग'च म्हणायचे. एक पोरगेलासा कामगार पुढे झाला. 'असं करतात कटिंग?' जर्नलच्या कुरतडलेल्या कडांवरून हात फिरवत गोताडनी विचारले. 'बरंय, माजिर्न भरपूर आहे. अजून एक छाट घेता येईल' असे स्वत:शीच पुटपुटत ते माझ्या मित्राला म्हणाले, 'साएब, तुम्ही जेवण करून या. तवर मी जाब नीट करून ठेवतो.' गाळ्यासमोरच्या उन्हात त्यांनी ते जर्नल ठेवले व परत त्यांच्या कामाला लागले.

माझ्या शेजारीच राहणाऱ्या मित्राने सकाळीच एक फाटकेतुटके पण महत्त्वाचे प्रॉडक्ट जर्नल माझ्याकडे दिले होते. प्रेसमध्ये आल्याआल्याच मी ते बाईंडिंगसाठी शेजारच्या गाळ्यात गोताडांकडे दिले होते. दोस्तीखात्यात अशी फालतू कामेही ते करत असत.

मुंबईतल्या शेकडो इंडस्ट्रीयल इस्टेट्ससारखीच तीही एक होती. गिलावा उडालेल्या भिंती, कधीही कोसळून पडेल अशी डुगडुगती लिफ्ट, मशिन्सचा गोंगाट, इस्टेटच्या बाहेर पडताच दाट झोपडपट्टीतून जाणारा खड्ड्याखड्ड्यांचा रस्ता, कडेने वाहणारे सांडपाणी, घाण... टेलरिंग, वेल्डिंग, मोल्डिंग, पॅकिंग वगैरे उद्योग तिथल्या ५० गाळ्यांमध्ये चालत. माझा प्रिंटिंग प्रेस हा त्यातलाच एक. मुंबईतल्या अनेक बड्याबड्या कंपन्यांचा डोलारा अशा इंडस्ट्रीयल इस्टेट्समधून चाललेल्या कामांवरच अवलंबून होता. पलीकडेच असलेला वरळीचा चकचकाट बघणाऱ्याला कल्पनाही यायची नाही की, जेमतेम हाकेवरच्या आडगल्लीत मुंबईचे हे दुसरेही एक रूप आहे.

जेवण उरकून आम्ही परतलो. कळकट टॉवेल आणि बनियनवरचे गोताड लगेच पुढे आले. उन्हात ठेवलेले जर्नल त्यांनी आत आणले, कटिंग मशीनवर घेऊन त्याला तिन्ही बाजूंनी व्यवस्थित छाट मारली आणि मग त्या गुळगुळीत कडांवरून अलगद बोटे फिरवत मघाच्या त्या मुलाला म्हणाले, 'असं कटिंग पायजे.' 'साएब, मघाशी बायडिंग ओलं असतानाच मी कटिंग केलेलं,' मुलगा सफाई देऊ लागला. 'माहितेय. पण मी सुकवून घेतलं, तसं तू का नाही केलं?' गोताडनी विचारलं. 'कष्टमरला घाई व्हती. मी म्हणलो, आत्ताच कापलं तर एज स्मूत नाय येणार. कष्टमर म्हणला, चलता है. म्हणून तशीच छाट मारून दिलं,' मुलगा म्हणाला. काही क्षण गोताड स्तब्ध राहिले. मग आजूबाजूच्या १५-२० कामगारांना उद्देशून म्हणाले, 'हे बगा, कष्टमर काय वाटेल ते चालवून घेल. पण माझ्याकडे 'चलता है' चालणार नाय. आपण नंबर एकचे कारागीर आहोत. आपलं हाय स्टांडर्ड आपण कधीच सोडायचं नाय.'

जर्नल घेऊन मित्र गेला. मीही माझ्या प्रेसमध्ये परतलो. पण बाईंडरचे ते शब्द कानात घुमत राहिले. गोताड आपल्या कामात अत्यंत वाकबगार होते. लेदर बाईंडिंगमधे त्यांचा हात धरणारं मुंबईत कोणी नव्हतं. बुकाच्या स्पाइनवरच्या बॅकचा गोलाकार त्यांच्यासारखा कोणालाच जमायचा नाही. काम करण्याचा त्यांचा स्टॅमिना अफाट होता. आणि स्वत:च्या कारागिरीचा अभिमानही. गोताड फारसे शिकलेले नव्हते, पण 'योग: कर्मसु कौशलम्' हे गीतावचन त्यांच्या अंगी पुरते मुरले होते.

या घटनेला अनेक वषेर् उलटली. एकदा इंग्लंडमध्ये रोल्स रॉइस कंपनीचा कारखाना बघायचा योग आला. तिथे जागोजागी लिहिले होते, 'कुठलेही काम, कितीही क्षुल्लक असो, चांगल्या प्रकारे केले, तर महानच असते.' हे आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे. इथलं प्रत्येक काम, मग ते साधा नटबोल्ट बसवायचं का असेना, ते नेहमी सवोर्त्तम क्वालिटीचंच होतं. म्हणूनच आमची कार जगात नंबर वन मानली जाते,' तिथले एक मॅनेजर सांगत होते.

पुढ्यातल्या लखलखीत चंदेरी रोल्स रॉइसऐवजी माझ्या डोळ्यापुढे एकदम कळकट टॉवेल आणि बनियनमधले गोताड बाइंडर दिसू लागले.

- भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>