Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

चंदूभाईंची 'फिलोसोफी'

$
0
0

- भानू काळे

बिझिनेस मॅनेजमेंट हे आज शिक्षण क्षेत्रातले एक चलनी नाणे बनले आहे. पण या बिझिनेस स्कूल्समधून कधीच शिकवल्या जात नाहीत, अशा अनेक व्यावहारिक गोष्टी असतात. मुंबईतली प्रत्येक इंडस्ट्रीयल इस्टेट म्हणजे अशा व्यावहारिक गोष्टी शिकवणारी एक शाळाच असते. तिथला एक महत्त्वाचा धडा म्हणजे वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना 'मॅनेज' करणे. पस्तीसएक वर्षांपूर्वी जेव्हा मी मुदणव्यवसाय सुरू केला, तेव्हा गुमास्ता खाते, लेबर डिपार्टमेंट, फॅक्टरी अॅक्ट, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, एक्साइज, म्युनिसिपाल्टी वगैरे अनेक ठिकाणचे अधिकारी आमच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये फेऱ्या घालत असत. माझे एक शेजारी चंदूभाई नावाचे वयस्क गुजराती उद्योजक होते. या अधिकाऱ्यांविषयी बोलताना एकदा ते म्हणाले, 'मेरी सिंपल फिलोसोफी है. ये सब सरकारी बम्मण है और उनको दक्षिणा देनीच पडती है. हरेकको उसका उसका पाकिट दे देनेका.' व्यवहारज्ञानालाच चंदूभाई 'फिलोसोफी' म्हणत. हे अधिकारी तसे खूप वरिष्ठ पदावरचे नसत, पण तुम्हाला त्रास द्यायची त्यांची शक्ती प्रचंड असायची. चंदूभाईंच्या मते, 'अपने कानूनही इतने काँप्लिकेटेड है, के इमानदारीसे कोई धंदा कैसे कर पाएगा?'

चंदूभाईंचा हातरूमाल बनवायचा व्यवसाय होता. काळबादेवीला दुकान होते, जे त्यांचा मोठा मुलगा सांभाळायचा. चंदूभाई इकडे प्रॉडक्शन बघायचे. त्यांची 'पाकिट फिलोसोफी' मला अर्थातच मंजूर नव्हती, कारण (माझ्या मते) मी कायद्यांचे तंतोतंत पालन करत होतो. तरीदेखील दोन-तीनदा मी उगाचच अडचणीत सापडलो, पण मग प्रत्येक वेळी कोणातरी उच्चपदस्थाची ओळख काढून सुटलो. 'आप जैसे लोग हमेशा रिश्वत देकर उनकी नियत खराब करते है,' एक दिवस मी चिडून चंदूभाईंशी वाद घालू लागलो. त्यांच्यासारख्यांमुळेच माझ्यासारख्या प्रामाणिकपणे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांची गोची होते याविषयी माझी खात्री होती. पाच-दहा मिनिटे मला तावातावाने बोलू दिल्यानंतर चंदूभाई शांतपणे म्हणाले, 'तुमको प्रोब्लम आता है, तो तुम इन्फ्लूअन्स लगाते हो. मगर अपनेको इतने सारे डिपार्टमेंट्स के साथ डील करना पडता है. तुम हर टाइम किसकी पैचान निकालोगे? किधर किधर इन्फ्लूअन्स लगाओगे? मेरा फिलोसोफी सिंपल है. पाकिट दिया, बात खतम. और एक बताओ कालेमाष्टर, पैसा देके पटाना और इन्फ्लूअन्स लगाके पटाना, इसमें खास फर्क क्या है?' यावर मी चंदूभाईंना लंबेचवडे प्रत्युत्तर दिले खरे, पण मनातल्या मनात मी निरुत्तर झालो होतो, अहंकाराच्या फुग्याला टाचणी टोचली होती.

असाच आणखी एक प्रसंग. जवळचीच एक गल्ली वेश्यावस्तीसाठी कुविख्यात होती. कधी कामानिमित्त त्या वाटेने रात्रीचेही जावे लागे. त्याचा खूप त्रास वाटायचा. एकदा तिथल्या बायकांविरुद्ध सात्त्विक संतापाने मी काही बोललो. चंदूभाई म्हणाले, 'जिन लोगोंसे पैसा, पब्लिसिटी या बडप्पन मिलता है, उनके बारेमें मॅक्जिमम जनेर्लिस्ट और रायटर अच्छाही लिखते होंगे. कमसेकम बुरा तो पक्का नही लिखेंगे. मतलब, आपको जो चाहिए, उसके लिए लोग दिमाग बेचते है. उन लडकियों को पैसा चाहिए और उसके लिए वो बदन बेचती है. अब दिमाग बेचना और बदन बेचना इस में क्या फर्क है कालेमाष्टर?' मॅट्रिकसुद्धा पास न झालेल्या आणि शेअरबाजाराच्या 'भाव कॉपी'पलीकडे कसलेच वाचन न करणाऱ्या चंदूभाईंनी पुन्हा एकदा माझी विकेट घेतली होती.

धंद्यात मुरलेले असूनही चंदूभाई स्वत:ला खूप स्मार्ट वगैरे समजत नसत. त्यांनाही फसवणारी माणसे कधी भेटली आहेत का, अशी एकदा विचारणा केली असता ते म्हणाले, 'क्यूं नही? वैसेभी बोत लोग होते है. इसिलिए अगर मुझे सों रुपये कमाने है, तो मैं दोसों कमाता हूँ. फिर कोई आदमी मेरेको सों रुपये का टोपी लगाके गया, तोभी मैं घाटेमें नही हूँ. ठीक है ना मेरी फिलोसोफी?'

चंदूभाईंची 'फिलोसोफी' मला रुचणारी नव्हती, पण जीवनात पूर्णविरामांपेक्षा प्रश्नचिन्हे अधिक असतात याची जाणीव मला चंदूभाईंनी करून दिली.

-----------------------

'तिसरी चांदणी,' 'कॉम्रेड' यासारख्या कादंबऱ्यांमुळे रसिकांपर्यंत पोचलेले सकस लेखणीचे भानू काळे हे 'अंतर्नाद' या वाङ्मयीन, सांस्कृतिक आणि वैचारिक मासिकाचे संपादक आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>