Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

ब्रेड आणि सर्कस

$
0
0

पुण्याच्या आसपास काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अत्याधुनिक कारखाने उभे राहिले आहेत. अशाच एका कंपनीत काम करणाऱ्या मित्राबरोबर त्यांच्या 'अॅन्युअल डे'च्या निमित्ताने जायचा परवाच योग आला. ही कंपनी भारतातील सर्वात महागड्या मोटारी बनवते. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही कंपनीच्या आवारात प्रवेश केला. प्रशस्त प्रांगण, दुतर्फा पसरलेली हिरवळ, कडेकडेने लावलेली झाडे, वेगवेगळ्या विभागाच्या भव्य इमारती... डाव्या बाजूला लांबवर खूप गदीर् दिसत होती. आरडाओरडा कानावर पडत होता. 'मुख्य कार्यक्रम तिथेच आहे. तिथे जाऊ या, की आधी कारखाना आणि ऑफिस बघूया?' मित्राने विचारले.

मला आधी कारखाना आणि ऑफिस बघायचे होते; कारण तशी संधी सहसा मिळाली नसती. आम्ही त्या दिशेने वळलो. तळमजल्याला म्युझियम-सारखी रचना होती. मोटर इंजिनचा शोध लागल्यापासून आजतागायतचा मोटारींचा इतिहासच तिथे जुने फोटो, मॉडेल्स वगैरेंच्या साहाय्याने उभारला होता. १८८६ साली तयार झालेल्या व तिचाकी घोडागाडीसारख्या दिसणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटारीची प्रतिकृती तिथे होती आणि त्यांचे अगदी लेटेस्ट तीन कोटींचे मॉडेलही. 'अवघ्या दीड-दोनशे वर्षांत माणसाने केवढी प्रचंड प्रगती केली आहे बघा,' मित्र म्हणाला. त्यांचा अत्याधुनिक कारखानाही त्याने दाखवला. माझ्या दृष्टीने तो तासभराचा अनुभव खूपच रोचक होता. पण हे सगळे बघायला चार-पाचच इतर माणसे तिथे होती. 'खरं तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सगळा कारखाना एकदा बघता यावा म्हणूनच आम्ही 'अॅन्युअल डे' साजरा करतो. पण त्यांना याच्यात इंटरेस्ट नाही. जेवण व करमणुकीचे कार्यक्रम यातच त्यांना मजा वाटते. हे सगळे 'सोच मत' क्लबचे मेंबर्स आहेत,' मित्राने खुलासा केला. जरा वेळाने आम्हीही तिकडे गेलो.

तिथले दृश्य वेगळेच होते. दिव्यांच्या लखलखाटात तो परिसर उजळून निघाला होता. दोन-अडीच हजार माणसे तरी सहज असतील. कर्मचारी, त्यांची बायका-मुले, शेजारीपाजारी, सगळ्यात जास्त गदीर् होती फूडकोर्टवर. खमंग, चुरचुरीत वास जिव्हालौल्य जागृत करत होते. शीतपेये, स्नॅक्स, चाट, मुख्य बुफे, आइस्क्रीम-गुलाबजाम वगैरे सगळ्यांचीच रेलचेल होती. सगळे चवीचवीने खात होते. अन्नाची नासाडीही भरपूर चालली होती. कचऱ्याच्या पेट्या जागोजागी ठेवल्या होत्या पण तरीही जमिनीवर प्लेट्स, नॅपकिन्स, बिसलेरीच्या बाटल्या यांचा पसारा पडला होता.

फूडकोर्टला लागूनच फन पार्क होते. सिनेमात गावातली जत्रा दाखवतात तसे तिथले वातावरण होते. मेरी गो राऊंड, मुखवटे घातलेली व शिट्या वाजवणारी मुले, शिडीचे उंचउंच खोटे पाय लावून फिरणारे विदूषक, खेळातली आगगाडी, बुढीके बाल, पॉपकॉर्न, साबणाचे बुडबुडे, ज्योतिषी, व्हीडीओ गेम्स. सगळ्यांच्या अंगावर फॅशनेबल कपडे, पायात स्पोर्ट शूज, हातात मोबाइल. तिथे मनमोकळ्या गप्पा अशक्यच होत्या; कारण समोरच उभारलेल्या स्टेजवरून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात ऑक्रेस्ट्रा चालला होता. सोबत डीजेही होते. भोवताली काही मंडळी नाचत होती. कंपनीचे काही परदेशी डायरेक्टर्सही एका कोपऱ्यात बसून सगळा जल्लोष पाहत होते.

'आमचे बहुतेक कर्मचारी हे स्थानिकच आहेत,' मित्र सांगत होता, 'एमआयडीसी-कडून त्यांना जमिनीची उत्तम किंमत मिळाली. शिवाय कंपनीत नोकरीही मिळाली. ३०-३५ हजारांपेक्षा कमी पगार एकालाही नाही. पण हातात पैसा आला तरी त्यांच्या वागण्यात क्लास जराही आला नाही.'

दिवाळी भेट म्हणून 'सांस्कृतिक समृद्धी'च्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना दिवाळी अंक वाटावेत अशी विनंती करणारे एक पत्र काही वर्षांपूवीर् मी पुणे परिसरातील २०-२५ कंपन्यांना पाठवले होते. एकीकडूनही उत्तर आले नव्हते. मी फोनवर पाठपुरावा केला तेव्हा एक अधिकारी म्हणाला होता, 'त्यापेक्षा एखाद्या हॉटेलची डिनर कूपन्स दिलीत, तर कर्मचाऱ्यांना अधिक आवडेल.'

'लोकांना खुश राहण्यासाठी फक्त ब्रेड आणि सर्कस यांची गरज असते' असे दोन हजार वर्षांपूवीर् कोणीतरी रोमन सम्राट म्हणाला होता. नंतरच्या दोन हजार वर्षांत आपण खरी प्रगती किती केली?

- भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>